बेळगाव : संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून बेळगावमधून भाजपचे जगदीश शेट्टर, चिक्कोडीतून काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी तर उत्तर कन्नड मतदारसंघातून भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी निवडून आले आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जगदीश शेट्टर 173730 मतांनी विजयी झाले. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून मोठा बदल घडत प्रियांका जारकीहोळी यांनी भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला. प्रियांका जारकीहोळी या 92655 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 710823 आणि अण्णासाहेब जोल्ले यांना 618168 मते पडली तर कारवार लोकसभा मतदारसंघातून भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजपचे विश्वेश्वर कावेरी -हेगडे हे दोन लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यामध्ये भाजपचे जगदीश शेट्टर आणि काँग्रेस उमेदवार मृणाल हेबाळकर यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये जगदीश शेट्टर यांना 750949 मते मिळाली असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी 577219 मते घेत पिछाडीवर राहिले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील यांना 9425 मतांवर समाधान मानावे लागले.
चिक्कोडी मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी पहिल्यांदाच आपले नशीब आजमावले आणि विजयश्री खेचून आणली. बेळगाव जिल्ह्याला पहिल्यांदाच कमी वयातील तरुणी खासदार म्हणून लाभल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
कारवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विश्वेश्वर हेगडे -कागेरी हे 294553 मतांनी निवडून आले आणि भाजपचा बालेकिल्ला अबाधित राखला. यामध्ये विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांना 660979 मते तर काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना 366426 मते मिळाली.