
खानापूर : खानापूर तालुक्यातील हबनहट्टी येथील सर्व्हे क्रमांक ७ मधील खाणकाम सध्या चर्चेचा विषय ठरत असून, “परवानगी लॅटराईटची आणि उत्खनन बॉक्साईटचे” असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे खाण व भूविज्ञान विभाग, वन विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी लॅटराईट खनिजाच्या उत्खननासाठी शासनाकडून लीज मंजूर करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात उच्च दर्जाचे बॉक्साईट मोठ्या प्रमाणावर बाहेर काढले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. खनिज तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लॅटराईट आणि बॉक्साईट यामध्ये दर्जा, बाजारमूल्य आणि रॉयल्टीमध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे जर लॅटराईटच्या नावाखाली बॉक्साईटची वाहतूक होत असेल, तर हा केवळ नियमभंग नसून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसू शकतो.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न सरळ आहे – जर उत्खनन नियमांनुसार होत असेल, तर खनिजाचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र नमुना चाचण्या का केल्या जात नाहीत? संबंधित विभागांनी वेळोवेळी तपासणी केली आहे का? आणि केली असेल तर त्याचे अहवाल सार्वजनिक का केले जात नाहीत?
याहून गंभीर बाब म्हणजे या खाणीतून निघणाऱ्या ट्रकांच्या वाहतुकीबाबतही तक्रारी वाढत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ४० ते ४५ टनांपेक्षा अधिक वजन घेऊन ट्रक रस्त्यावरून धावत आहेत. या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या परिवहन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे का? नियमित तपासण्या होत आहेत का? की सर्व काही “मॅनेज” असल्याने कारवाई होत नाही? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणात खाण व भूविज्ञान विभाग, वन विभाग, पोलीस आणि परिवहन विभाग यांची भूमिका काय आहे, याबाबत आता जनतेला स्पष्ट उत्तरांची अपेक्षा आहे. परवानगीच्या अटी, उत्खननाचे स्वरूप, खनिजाचा दर्जा, रॉयल्टीची वसुली आणि ओव्हरलोड वाहतूक यांची उच्चस्तरीय चौकशी झाल्यासच सत्य समोर येऊ शकते.
दरम्यान, संबंधित विभागांच्या अधिकृत स्पष्टीकरणानंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार असली, तरी हबनहट्टीतील या खाणकामामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
“परवानगी लॅटराईटची… मग बॉक्साईटचे ट्रक कुठून येत आहेत?” हा प्रश्न सध्या हबनहट्टी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta