
४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप
बेळगाव : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने बेळगावस्थित शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सीआयडीच्या माहितीनुसार, शिवम असोसिएट्सने सुमारे ४०,७०० गुंतवणूकदारांकडून अंदाजे २,४०० कोटी रुपये जमा केले होते. नव्या गुंतवणूकदारांकडून जमा होणाऱ्या पैशातून जुन्या गुंतवणूकदारांना व्याज व परतावे दिले जात होते. मात्र नवीन गुंतवणूक कमी होत गेल्यानंतर ही संपूर्ण यंत्रणा कोलमडली आणि कथित फसवणूक उघडकीस आली.
सीआयडीच्या तपासात जमा झालेल्या निधीपैकी सुमारे ५४० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामध्ये १७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात ६६० कोटी रुपयांची आर्थिक तूट आढळून आली असून, त्यापैकी जवळपास ३३० कोटी रुपये वसूल होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
तपासादरम्यान आरोपीने कंपनीच्या निधीतून सुमारे ५५ कोटी रुपये वैयक्तिक खात्यात वळते केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये आणखी एका भागीदाराचा सहभाग असल्याचा संशय असून त्याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, सीआयडीने आरोपींकडून पाच आलिशान वाहने जप्त केली असून, कंपनीच्या निधीतून खरेदी करण्यात आल्याचा संशय असलेल्या आणखी ११ व्होल्वो XC90 गाड्या जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. तपासात ३० बँक खाती आढळून आली असून, त्यापैकी सात खात्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असल्याचेही तपासात समोर आले असून, महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने तपासाचा विस्तार करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना पूर्वी वितरित करण्यात आलेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रकमेच्या वसुलीबाबतही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले.
तपास यंत्रणांनी वसूल केलेली रक्कम संबंधित कायदेशीर प्राधिकरणाकडे जमा केली जाईल. त्यानंतर न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पात्र गुंतवणूकदारांना निधी परत करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta