शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघातील नेते मंडळी कार्यकर्ते व मतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सहकारत्न उत्तम पाटील यांनी आपल्या बहिणीला निवडून दिले आहे. याची जाणीव ठेवून काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षाची कामे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. लवकरच निपाणी आणि चिकोडी येथे कार्यालय सुरू करून सर्वांच्या समस्या सोडण्यासाठी आपण कायमपणे पाठीशी आहोत, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे गुरुवारी (ता.६) आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी उत्तम पाटील युवा मंच राष्ट्रवादी गटातर्फे खासदार जारकीहोळी यांचा सत्कार झाला.
सहकारत्न उत्तम पाटील यांनी, जारकीहोळी यांच्या विजयासाठी केवळ आपणच नव्हे तर कार्यकर्ते व आणि मतदार कारणीभूत आहेत. त्यामुळे भेदभाव न करता समस्या सोडवण्यासह विकास कामे करावीत. आता दोन्ही शक्ती एकत्र आल्याने मतदारसंघ भाजप मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, पालकमंत्री जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून गटबाजी न करता विकास कामात दुजाभाव होणार नाही, यासाठी प्रयत्न करू. आता तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूका होणार असून त्यासाठी तालीम तयार करून वारंवार कुस्त्या होणार असल्याचे सांगितले. अशोककुमार असोदे, ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजू पाटील, अरुण निकाडे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, संजय पावले, दत्ता नाईक, दीपक सावंत, गोपाळ नाईक, सुनील शेलार, दिलीप पठाडे, सचिन गारवे, अनिता पठाडे, दिपाली गिरी, नम्रता कमते, उपासना गारवे, शांती सावंत, इम्रान मकानदार,रवी गुळगुळे यांच्यासह निपाणी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.