निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता.६) शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी पांडुरंग वडेर यांच्या पौरोहित्याखाली सुरेश कुरणे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते शिवपुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे -देसाई सरकार यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बाबासाहेब खांबे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदारांना एकत्रित घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पराक्रमी वृत्तीने अनेक गड किल्ले जिंकले गेले. सध्याच्या युवकांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी, सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमास एम. बी. जाधव, उदय शिंदे, सुनील शेलार, रमेश निकम, पिंटू सूर्यवंशी, गणेश खडेद, नितीन साळुंखे, संतोष पाटील, आनंद पोवार, मारुती माने, प्रताप पाटील, सुरज पोटले, शितल बुडके, बाबासाहेब सुतार, धोंडीबा पोवार, सुनील जामदार, भरत कावळे, पंकज खटावे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.