महागाईला भाजपच जबाबदार
निपाणी (वार्ता) : राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून सामान्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. परंतु सामान्यांची कामे होताना भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी शुक्रवारी (ता.२१) मोजक्या कार्यकर्त्यासमवेत पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढी विरोधात काढलेला मोर्चा हा हस्यास्पद असल्याची टीका चिक्कोडी जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केला.
शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सर्व समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही शासनाच्या सवलती, सामाजिक न्याय आणि प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. देशामध्ये अत्यंत उत्तम असे प्रशासन राज्याला दिले आहे. एसटी निगम संदर्भात सखोल माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संबंधित मंत्र्यांनी राजीनामाही दिला आहे. त्याची कायदेशीर चौकशी चालू आहे. परंतु स्थानिक आमदारांनी मोठ्या प्रमाणात अंडी घोटाळा करूनही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा, अशा पद्धतीने निषेध मोर्चा काढणे हे केविलवाणे आहे.
महागाई, दरवाढीबाबत देशातील सामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महागाई ही केवळ केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना वाढली आहे. उलट केंद्र सरकारने सामान्यांना जगणे मुश्किल केले आहे. अशा काळात राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच सर्वसामान्यांना ताठ मानेने जगण्याचा अधिकार व स्वाभिमान काँग्रेस पक्षाने राज्यात मिळवून दिला आहे. आजही राज्यात झालेली पेट्रोल दरवाढ ही असली तरी देशातील कर्नाटकात हे दर कमी आहेत. याउलट भाजप आमदारांनी केंद्राकडे पाठपुरावा करून पेट्रोल डिझेलचे दर पन्नास रुपयांवर अणून दाखवावे. लोकांची दिशाभूल करण्यासह थांबवावे असे चिंगळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहण साळवे,
निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, प्रतिक शहा सुशांत खराडे, रोहित यादव, अवधूत गुरव, संजू कांबळे, रेवन्ना सरवगोळ, हाजी मुल्ला उपस्थित होते.
——————————————————————
मुख्यमंत्र्यांचे महत्त्व
केंद्रीय अर्थमंत्र्यांना बजेट मांडण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थतज्ञ सिद्धरामय्या यांचा सल्ला घ्यावा लागला. यावरूनच काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांचे महत्त्व दिसून येते, असेही चिंगळे यांनी स्पष्ट केले.