डॉ. स्नेहल पाटील; ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : जीवनात शिस्त, संयम, वक्तशीरपणा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करून त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा. जीवनात यश मिळवण्यासाठी मनात जिद्द ठेवून त्या दृष्टीने सतत प्रयत्न व श्रम करणे आवश्यक असल्याचे मत येथील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष एस. व्ही. पुंडे होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघाचे उपाध्यक्ष आर. डी. लठ्ठे यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. एस. आर. सोनारकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संघाचे अध्यक्ष एस. व्ही. पुंडे यांनी, विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता व अपयशाने न खचता मी माणूस आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय निरंतरपणे समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
डॉ. पाटील यांनी मराठी साहित्यिक ‘डॉ. राजेंद्र ठाकूर यांच्या साहित्यातील सामाजिक दृष्टिकोन’ या विषयावर पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी, बारावी परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास पी. जी. शहा, एम. ए. नाईक, भारत पाटोळे, मारुती माने, बी. एन. भोपळे, पवन रांगोळे, रवींद्र हुन्नरगी, व्ही. एन. कुलकर्णी, आर. व्ही. सुतार, बी. डी. तोडकर, ए. एन. गायकवाड, एस. बी. चव्हाण, व्ही. ए. उपाध्ये, के. बी. पाटील यांच्यासह संघाचे सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. एस. आर. सोनारकर यांनी सूत्रसंचालन केले. आर. डी. सावंत यांनी आभार मानले.