निपाणी (वार्ता) : येथील शिक्षण सेवा मंडळ संचलित विद्यामंदिर शाळेचे गणित शिक्षक आप्पासाहेब खराडे यांचे नुकतेच निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला फाटा देऊन रोपांचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमित खराडे आणि कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना १२५ रोपांचे वाटप करून पर्यावरण पूरक उत्तरकार्य पूर्ण केले.
आप्पासाहेब खराडे हे पर्यावरणवादी होते. गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन त्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. आपल्या मृत्युनंतर तिसऱ्या दिवशी धार्मिक कार्य पूर्ण करावीत. त्याबरोबरच नागरिकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा, हा संदेश द्यावा. बारा दिवस दुखवटा पाळून घरातील महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये. हा विचार मुलगा अमित खराडे आणि सुन विद्यामंदिर शाळेची गणित शिक्षिका प्रतिभा खराडे यांना मृत्युपूर्वी सांगितला होता. या विचाराची अंमलबजावणी या दाम्पत्याने केली.
माजी आमदार काकासाहेब पाटील, हालशुगरचे माजी संचालक मुकुंदराव देसाई, पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले, सकल मराठा समाजाचे सुधाकर सोनाळकर, शिरगुप्पी
ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आनंदा कुंभार यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक पी. टी. शाह, मुख्याध्यापक पी. एम. पाटील, आप्पासो सुगते, सचिन पाटील, चंद्रकांत मोरे, रवींद्र खोराटे, विकास नवाळे, राजू कराळे, सुरेश वागळे, राजाराम रानमाळे, उमेश सुपले, विजय गायकवाड, ओंकार पेडणेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.