Tuesday , September 17 2024
Breaking News

सीमाभागातील प्रेक्षकांनी ‘गाभ’ चित्रपट पाहावा यासाठी मराठी हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ग्रामीण संस्कृतीचा बाज असलेला ‘गाभ’ मराठी चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित झाला. वेगळे कथानक असल्यामुळे मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. बेळगाव सीमा भागातील जत्राट येथे लक्ष्मण पाटील या तरुणाने कर्नाटकात मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार व्हावा, यासाठी या चित्रपटाचे तिकीट घेऊन आपल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी २० टक्के दरात सवलत देऊन अभिनव उपक्रम राबवला आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास समजावा यासाठी हॉटेलचा लूकही किल्ल्याप्रमाणे करण्यात आला असून मराठी भाषेसाठी धडपडणाऱ्या या तरुणाचं सीमाभागात कौतुक होत आहे.
अनुप जत्राटकर लिखित, दिग्दर्शित ‘गाभ’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात गावगाड्याचा आर्थिक कणा असलेल्या दुग्ध व्यवसायाच्या वास्तवावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. रेड्यांची कमी होणारी संख्या यामुळे म्हैस गाभण राहण्यासाठी करावी लागणारी वणवण या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
अस्सल ग्रामीण प्रेम कथाही चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सीमा भागातीलच उदयन्मुख लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक पुरस्कार जाहीर झाले. राज्य शासनाच्या वतीने कांन्सच्या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘गाभ’ सिनेमाचा प्रीमियर पार पडला होता. यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आता निपाणी सीमा भागात जत्राटमध्ये लक्ष्मण पाटील या तरुणांने मराठी भाषा सर्वदूर पोहचावी, यासाठी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यापूर्वी अमोल कोल्हे यांची भूमिका असलेला गरुडझेप, तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तान्हाजी हा चित्रपटही लक्ष्मण पाटील यांनी मराठी भाषिकांसाठी मोफत दाखवला होता. सीमाभागात मराठीची होणारी अवहेलना लहानपणापासून पाहिली आहे. यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मराठीलढा यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.
——————————————————————–
किल्ल्यांची नावाची दालने
हॉटेल व्यवसायिक असलेल्या लक्ष्मण पाटील यांचे निपाणी जवळील जत्राट गावात हॉटेल येस राजवाडा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग, विशाळगड, पन्हाळा, सिंहगड, पारगड, प्रतापगड, रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी अशी भोजनाच्या दालनांची नावे आहेत. हॉटेलच्या मागच्या बाजूस एखाद्या राजवाड्याचा फील यावा, अशा पद्धतीचे स्टेज आहे. हॉटेलमध्ये येणारे खवय्ये छत्रपती शिवरायांचा मावळा असलेल्या लक्ष्मण पाटील यांचे मराठीचे प्रेम पाहून अचंबित होत असल्याचे चित्र सीमा भागात पाहायला मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *