निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मुख्य सचिव रजिस्टर डॉक्टर व्ही. एन. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील 865 गावातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी एमबीए, बीसीए, एमसीए, बीएड यासारखे उच्च शिक्षण तसेच मोफत वसतीगृह अशा शैक्षणिक सवलती सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांना सीमा भागाच्या राखीव कोट्यातून उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणाचे दालन खुले करून दिले आहे. सीमाभागातील अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर महाराष्ट्रात कार्यरत आहे. यापुढे देखील सीमाभागातील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा मिळावा यासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाशी संपर्क करावा आणि व अधिकाधिक विभागांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती प्रवक्ते व खजिनदार नेताजी पाटील (कुर्ली), कार्याध्यक्ष श्री. बंडा पाटील (मत्तीवडे), बळीराम पाटील, वैष्णवी पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.