नगरपालिकेने सोडला सुटकेचा निःश्वास
निपाणी (वार्ता) : निपाणीची जीवनदायिनी असणारा जवाहर तलाव आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. यंदा सुरुवातीपासूनच शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलाव भरून पाणी तलावाबाहेर पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडले. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला असून नगरपालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता तरी शहरवासियांना २४ तास पाणी मिळणार का? असा प्रश्न व अपेक्षा केली जात आहे.
यंदा जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी पातळी ४३ फुटांवर होती. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगर भागातून शिरगुप्पी ओढ्यांचे पाणी मिसळत आहे. त्यामुळे झपाट्याने पातळीत वाढ झाली.
जवाहर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. यंदा उन्हाळ्यात तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने २ महिन्यापासून पालिकेकडून शहर, उपनगराला चार ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. यंदा तलावाची ४६ फूट एक इंच पाणी पातळी झाल्यानंतर पश्चिमेकडील सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. सांडव्यावर बरगे घातल्याने गतवर्षर्षीपेक्षा तलावातील पाणी पातळी वाढली आहे. ४ दिवसांच्या दमदार पावसामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. तलाव भरला असला तरी पालिका प्रशासनाच्या नियोजन अभावी पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा विभागातील अपूर्ण कामे पूर्ण करून त्यांना तात्काळ पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याचा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
——————————————————————-
प्रांताधिकार्याकडून पाहणी
जवाहर तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर प्रांताधिकार्यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय जल शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना केल्या.
——————————————————————
‘यंदाच्या हंगामात जवाहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या चार ते पाच दिवसातून पाणी दिले जात आहे. यापुढील काळात क्लोरीन आणि आलमचे प्रमाण वाढवून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.’
-प्रवीण कणगले, इन्चार्ज पाणीपुरवठा विभाग
नगरपालिका निपाणी
——————————————————————
‘शहर आणि उपनगरात २४ तास पाणी योजनाजोडणीची कामे पूर्ण झाली असेल लिकेजची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.’
-लक्ष्मीकांत, अभियंते जैन इरिगेशन