रयत संघटना आक्रमक: आंदोलन छेडण्याचा इशारा
निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून कोगनोळी टोल नाका येथील पिडित शेतकरी बंधू व किरकोळ विक्रेते यांनी अधिकाऱ्यांना सर्वे बंद करण्यास भाग पाडले होते. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्याशिवाय पुढील निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. परंतु अचानक सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन बेळगाव कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले होते. अचानक आलेल्या नोटिसीमुळे सर्व शेतकरी बंधू चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव कार्यालयात उपस्थिती लावली. परंतु तिथे कोणीच जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे राजू पोवार चांगलेच संतापले. त्यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना चांगलेच धारेवर धरून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संबंधित अधिकारी (असिस्टंट कमिशनर रविंद्र करिलिंगनवर) येत नाहीत तोपर्यंत कार्यालयात आंदोलन सुरूच ठेवले.
तातडीने रविंद्र करिलिंगनवर (असिस्टंट कमिशनर) कार्यालयात उपस्थिती लावली आणि सर्व शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले. राजू पोवार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. तसेच पुन्हा असा प्रकार झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कर्नाटक राज्य रयतसंघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, कार्यदशी प्रकाश नाईक, बुदिहाळ शाखा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जैन वाडी शाखा अध्यक्ष नामदेव साळुंखे, शिवापूर वाडी शाखा अध्यक्षअनिकेत खोत, गजबरवाडी शाखा अध्यक्ष रमेश गळतगे, कोगनोळी येथील नारायण पाटील, अनंत पाटील, युवा ग्रामिण अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, मत्तिवडे शाखा अध्यक्ष शरद भोसले, उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, सुनील माने, युवराज माने, राजू चौगले, राजू पाटील, उमेश परीट, अभिनंदन चौगले, शब्बीर मुल्ला, अकबर नदाफ, सावजी तसेच रयत संघटनाचे सदस्य उपस्थित होते.