Tuesday , March 3 2026
Breaking News

थकित वेतन दिल्याशिवाय पाणी नाही

Spread the love

 

पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कामगारांचा इशारा; सोमवारपासून पाणी बंद

निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या २४ तास पाणी योजनेचे कंत्राट जैन इरिगेशन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण ४० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पण चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दोन वेळा निवेदन घेऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता.२९) काम बंद केले आहे. रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पाणीपुरवठा विभागातील या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. याशिवाय वेतनाअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी नगरपालिका आयुक्त, जैन इरिगेशनचे कंत्राटदार, अधिकार्‍यांना दोन वेळा निवेदन देऊनही वेतन दिलेले नाही.
वेतनाची मागणी केल्यानंतर काही अधिकारी कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. त्याशिवाय कामावरून कमी करण्याची धमकीही दिली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जॅकवेल, तलाव आणि इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ थकीत वेतन देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी शासन नियुक्त नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, अशोक लाखे यांनी संपाच्या ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन देण्याची मागणी केली.
संपामध्ये संजय जाधव, निलेश पावले, विशाल जगताप, नेमिनाथ माने, नेमिनाथ शिंदे, सागर कस्तुरे भुपाल कांबळे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

——————————————————————–
पाणी प्रश्न गंभीर बनणार
सर्व कामगार कार्यरत असताना शहराला तीन ते चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. आता थकीत वेतनासाठी २४ पाणीपुरवठा योजनेतील ४० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्न आणखीन गंभीर बनण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *