निपाणी दलित बांधवांची बैठक ; ग्राम पंचायत अध्यक्षांचा हक्क हिरावला
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील ग्रामपंचायतची नवीन इमारत मनरेगांमधून बांधण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये ग्रामपंचायत अध्यक्षांचे नाव छापणे आवश्यक होते. पण लोकप्रतिनिधींनी सदरच्या अध्यक्षा या दलित असल्याने त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना कार्यक्रमापासून बाजूला ठेवले. त्यामुळे दलित महिलांच्या आरक्षणाचा उपयोग काय? असा सवाल करून निपाणी भागातील दलित बांधवांनी सोमवारी दुपारी (ता.१२) या घटनेचा निषेध व्यक्त केला.
माजी नगरसेवक युवराज पोळ यांनी, ग्रामपंचायत मधील कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला शिष्टाचारानुसार ग्रामपंचायत अध्यक्षा याच अध्यक्ष असल्या पाहिजेत. पण पत्रिकेमध्ये त्यांचे नावही घातलेले नाही. शिवाय त्यांच्या अनुपस्थितीतच धार्मिक कार्यक्रम आटोपला आहे. या गैर कृत्याचा समाज बांधवांनी निषेध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अशोक लाखे यांनी, यरनाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आहे. तरीही दलित समाजाच्या अध्यक्षांना विश्वासात न घेताच उद्घाटनचा कार्यक्रम सुरू आहे. इमारतीचे उद्घाटन होऊ नये, त्यासाठी पोलिसांना तक्रार देऊनही लोकप्रतिनिधींनी उद्घाटनाचा कार्यक्रम करणे चुकीचे असल्याचे सांगितले. नगरसेवक रवींद्र श्रीखंडे,
किसन दावणे, सुभाष कांबळे यांनी, सध्या दलित समाजातील पदाधिकाऱ्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या विरोधात सर्वांनी आवाज उठवून शनिवारी (ता.१७) होणाऱ्या इमारतीच्या उद्घाटनास दलित बांधवासह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी नंदकुमार कांबळे, सचिन कांबळे, जगदीश हेगडे, संजय पाटील, सुभाष यमकण, विवेक कांबळे, सिद्राम मधाळे, प्रकाश कांबळे, राजाप्पा मधाळे, जीवन घस्ते, प्रशांत हंडोरी, अभिजीत कौंदाडे, सुशांत खराडे, कैलास ढाले, चंद्रकांत कांबळे, नेताजी पोवार, अवबा पोवार यांच्यासह यरनाळ,निपाणी परिसरातील दलित बांधव उपस्थित होते.