निपाणीत डॉ. आंबेडकर शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देशातील राजकारण आणि समाजकारणात शाहू, फुले आंबेडकरांचे मोठे कार्य झाले आहे. डॉ. आंबेडकर हे संविधान ज्ञानक होते. शाहू महाराजांनी केलेले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निपाणी येथे ११ एप्रिल १९२५ रोजी पहिली सभा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर संविधान प्रेमींतर्फे प्रथम पदस्पर्श शताब्दी वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. रविवारी (१८) रोजी दुपारी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अच्युत माने होते.
खासदार शाहू महाराज म्हणाले, समाजातील अस्पृश्यता आटोक्यात आली असली तरी अजूनही जात धर्मावर आधारित दंगली सुरूच आहेत. त्या थांबविण्यासाठी सर्वांनी सातत्याने एकत्र येणे आवश्यक आहे. डॉ. आंबेडकरांच्या नावाखाली अनेक पक्ष निर्माण झाले आहेत. त्यामुळे इतरत्र न विखुरता एकत्र आल्यास ताकद वाढणार आहे. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दिखाऊ पण आला आहे. त्यापासून दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही शाहू महाराजांनी सांगितले. खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा नारा दिला होता. त्यांच्या संविधानामुळेच समाज सुशिक्षित होऊन नोकरदार बनला आहे. संविधान नसते तर आरक्षण व पदे मिळाली नसती. त्यामुळे युवा पिढीने आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे. सर्वच क्षेत्रात महिला पुढे येऊन अनेक पदे भूषवित आहेत. आंबेडकरांनी चिकोडी न्यायालयात दोन खटले चालविले होते. शिवाय प्रसन्ना वराळे हे सुद्धा या भागातील असून संविधानामुळे ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संधी नुसार काम करावे. समाजातील अडीअडचणी बाबत आपण सातत्याने लोकसभेत आवाज उठवणार आहे. याशिवाय निपाणीतील क्रांती स्तंभाच्या शिलालेख कामाची पूर्तता करण्याची ग्वाही दिली.
आमदार शशिकला जोल्ले यांनी, डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळेच आमदारांनी मंत्रीपदी मिळाली. छत्रपती शाहू महाराज आणि आंबेडकरांचे नाते मानवीय होते. त्यांच्यामुळेच दलितांना नवी शक्ती मिळाली आहे. समाज बांधवांनी एकत्रित येऊन महामानवांचे विचार आत्मसात करावेत. स्तंभातील शिलालेखासाठी आराखडा दिल्यास तात्काळ निधी मंजूर करू. याशिवाय स्तंभासमोर निपाणीत डॉ. आंबेडकरांचा घोड्यावर बसून काढलेल्या छायाचित्रानुसार पुतळा उभा करणार आहे. समाज बांधवांसाठी अत्याधुनिक ग्रंथालय, प्रयोगशाळा व उद्या. निर्मितीची ग्वाही दिली. प्रा. जे. डी. कांबळे यांच्यासह मान्यवरांनी यांनी मनोगत व्यक्त केले.
अमित शिंदे यांनी स्वागत तर शताब्दी कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. राहुल शितोळे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले.
कार्यक्रमास काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सहकाररत्न उत्तम पाटील, पंकज पाटील, राजेंद्र वडर, देवाप्पा इंगळे, हालशुगर अध्यक्ष एम. पी. पाटील, नगरसेवक जयवंत भाटले, राजीव गुंदेशा, सुनील पाटील, रवींद्र श्रीखंडे, गणी पटेल, महेंद्र मंकाळे, सुरेश कांबळे, मल्लेश चौगुले, तहसीलदार प्रवीण कारंडे, प्रा. शरद कांबळे, अशोक माने साधना माळगे, संगीता माने, वर्षा चव्हाण यांच्यासह शहर आणि परिसरातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. संदीप माने यांनी आभार मानले.