निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या (एनएचएम) उपकंत्राटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत उपकंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या मागणीसाठी दंडाला काळ्या फिती बांधून गुरुवारी (ता.२२) आंदोलन केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी काम करत आहेत. नोकरीच्या सुरक्षेशिवाय असुरक्षितता आहे. योजनेंतर्गत कर्मचारी चांगले काम करून रुग्णांची चांगली सेवा करत आहेत. नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करूनही सरकार प्रतिसाद देत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ ऑगस्टपासून पाच दिवस दंडाला काळा फिती बांधून कामावर हजर राहून प्रतिकात्मक संघर्ष केला जाणार आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यास शुक्रवारी (ता.२३) सर्व जिल्हा व तालुका केंद्रावर कामावर बहिष्कार टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
एनएचएम योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या २८ हजार २२८ कर्मचाऱ्यांना तात्काळ कायम करण्यात यावे. काँग्रेस सरकार जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता करावी, असे आग्रही निवेदन टीएचओना दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनात आयुष मेडिकल ऑफिसर प्रमोद, गनादेनशचन्न, मल्लाप्पा नरेगल, अलशिबा सूर्यवंशी, मालाश्री करडीमठ, शाहीन मुकेरी, अधिकारी आनंद, विद्या मादर, उमा काकती, कुमार लक्ष्मीनवर, प्रशांत गोंधळी, सुरेश कुमदेश्वर, सुनील चौगुले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta