निपाणी (वार्ता) : कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य, अपूर्ण शिक्षण, मुलींची लग्ने अशा परिस्थितीमध्ये यासीन मनेर यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे बस स्थानकात बसमध्ये पाण्याची बाटली, बिस्किट, चॉकलेट, सोडा, सरबत, गोळ्या विकून पोटाची खळगी भरावी लागली. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून कर्नाटक राज्य रोजगार हमी योजनेच्या निपाणी तालुका सदस्यपदी निवड झाली आहे.
यासीन मनेर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबीतून घालवले. शैक्षणिक जीवनात कोणाचाही आधार नसताना वर्ग मित्रांनी एकत्रित येऊन त्यांना मदतीचा हात दिला. रस्त्यावर वस्तू विकून प्रपंच चालवत असताना त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली. पण मनेर यांनी प्रामाणिकपणा सोडला नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून गेली ४० वर्षे मनेर हे बस स्थानकात पाण्याच्या बाटल्या व इतर पदार्थ विकून जीवन कंठत आहेत. निपाणी व्यतिरिक्त दावणगिरी धारवाड बस स्थानकावर काम करून तिथेच राहत होते. याशिवाय फुल विक्रीच्या ठिकाणीही काम करत होते.
यासीन यांना एक मुलगा असून तो सध्या बेळगाव येथे काम करत आहे. पण अजूनही यासीन यांना घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सध्या हॉटेलमध्ये जेवण आणि मित्रपरिवारांकडे वास्तव्य करीत आहेत. सर्व धर्मीय कार्यक्रमाला त्यांची आवर्जून उपस्थिती असते. असा संघर्ष करत असताना त्यांना रोजगार हमी योजनेचे तालुका सदस्य पद मिळणे, हे तितके सोपे नाही.
Belgaum Varta Belgaum Varta