नाट्यमय घडामोडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेवर बालेकिल्ला अबाधित राखण्यात भाजपाला यश आले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता दिलीप पठाडे व उपनगराध्यक्ष पदाचे शेरे बडेघर यांना १४ मते मिळाली.
काँग्रेसच्या दोन आणि अपक्ष एक नगरसेवकांच्या सहकार्याने भाजपाने सत्ता अबाधित ठेवली आहे. आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नगरपालिकेवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
बेळगांव जिल्ह्यासह सीमाभागातील राजकीय गोटात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत विविध प्रकारच्या चर्चेला उधान आले होते. लोकसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवारांंना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिल्याने या निवडणूकीत काँग्रेस गटाचे ४ नगरसेवक राष्ट्रवादीबरोबर राहून पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण नेत्यांच्या आपापसातील मतभेदाचा मुद्दा पुढे करीत काँग्रेसच्या ३ पैकी २ आणि एक अपक्ष नगरसेवकांना भाजपा मतदान केले. तर एका नगरसेविका गैरहजर राहिली. त्यामुळे आमदार व १३ भाजपा नगरसेवकासह भाजपने सत्ता स्थापन केली.
भाजपाच्या बाजूने आमदार शशिकला जोल्ले, सुजाता कदम, राजेंद्र गुंदेशा, संतोष सांगावकर, प्रभावती सुर्यवंशी, गिता पाटील,
सोनल कोठडीया, जयवंत भाटले, रंजना इंगवले, डॉ.जसराज गिरे, अरूणा मुदकुडे, सद्दाम नगारजी, विलाख गाडीवड्डर, निता बागडे, आशा टवळे, बाळासाहेब उर्फ सुरेख देसाई-सरकार, कावेरी मिरजे यांनी मतदान केले.
यामध्ये आमदारासह भाजपाचे १३ तर निपाणी शहर विकास आघाडीचे विलास गाडीवड्डर यांनी भाजपाला पाठिंबा दिला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खासदार प्रियंका जारकिहोळी, नगराध्यक्ष पदाच्या दावेदार नगरसेविका अनिता पठाडे, संजय सांगावकर, रविंद्र शिंदे, राणी शेलार, दिपाली गिरी,
दत्ता नाईक, संजय पावले, विनायक वडे, शौकत मगियार, संतोष माने, सर्फराज उर्फ शेरू बडेघर, शांती सावंत, उपासना गारवे यांनी मतदान केले.
दोनही गटाकडून राजकीय ताकद लावण्यात आली होती. मात्र ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या युतीचा परिणाम निपाणीतही झाला. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी भाजपा बरोबर युती करून भाजपाला सत्ता देण्याचे काम केले. विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या दणदणाट, फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विजयोत्सवात आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हालशुगर चेअरमन एम. पी. पाटील, व्हा. चेअरमन पवन पाटील, संचालक, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.