अरिहंत क्रेडिट मल्टीस्टेटची वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : अहवाल सालात संस्थेत एकूण १३९७४ सभासद, ५कोटी ७८ लाखावर भाग भांडवल, ७९ कोटी ७० लाखावर निधी, १२०२ कोटींची ठेव, १९ कोटी २७ लाखांवर गुंतवणूक ९९७ कोटी ८० लाखांवर कर्ज वितरण करुन संस्थेस अहवाल सालात ११ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी दिली. बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
प्रारंभी अरिहंतचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली.
संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील अहवाल वाचन केले.
द. भा. जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी, अरिहंतचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात बरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिले. आरोग्य, शिक्षण, संस्कार, संस्कृतीसह इतर क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. पुत्र अभिनंदन व उत्तम यांनीही दादांच्याप्रमाणे त्यांची शिकवण लक्षात घेत संस्था चांगल्या पद्धतीने चालवीत आहेत. दादांच्या नंतर दोघेही पुत्रांनी सहकार क्षेत्रात संस्थेचे नाव उज्वल करीत असल्याचे सांगितले.
सीईओअशोक बंकापूरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून बेळगांव तर उत्तम व्यवस्थापक म्हणून अंकली शाखेचे शिवानंद इंगळे, उत्तम सेवक म्हणून लक्ष्मण मगदूम यांची घोषणा केली. त्याचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र, शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
उत्तम पाटील म्हणाले, संस्थेच्या वार्षिक सभेला दादा उपस्थित नाहीत. पण त्यांची उणीव जाणवत सर्वांच्या आशीर्वादाने दादांनी दिलेली शिकवण लक्षात घेऊन त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने आपण वाटचाल करणार आहोत. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अरिहंत संस्थेने सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मदत केली आहे. संस्थेने योग्य नियोजन, कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने संस्था आर्थिक प्रगती साधत आहे. लवकरच कोल्हापूर रुईकर कॉलनी, गांधीनगर, सातारा, पुणे, कोथरूड पुणे, पिंपरी चिंचवड, निगडी, नांदणी, रूकडी, इस्लामपूर, तासगाव व विटा या ठिकाणी संस्थेचे शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, बाळासाहेब पाटील, दिलीप पठाडे, बाबासाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, दिपाली पाटील, संचालक सुभाषी शेट्टी, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, संदीप पाटील, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, शिवानंद राजमाने, मुख्य व्यवस्थापक ए. जे. बंकापुरे, दत्तचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक इंद्रजीत पाटील, अरुण देसाई, महावीर कात्राळे, अरुण निकाडे, निरंजन पाटील, इम्रान मकानदार, सुंदर पाटील, अभय मगदूम यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. सचिन हंचिनाळे, रावसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. अभय कुमार करोले यांनी आभार मानले.