निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा रविवारी (ता१५) सप्टेंबर त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत देण्याबाबतचे लेखी निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेने दिले होते. पण कारखान्याच्या संचालक मंडळांनी या पदाधिकाऱ्यांना सभेत जाण्यास मज्जाव केला. शिवाय प्रवेशद्वारावरून आत सोडले नाही. त्यामुळे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्की करणाऱ्या वर पुन्हा दाखल करण्यायाबाबतचे निवेदन संघटनेने मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना दिले.
रयत संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला पूर्वी माहिती देण्याबाबतचे निवेदन दिले होते. शिवाय माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला होता.
सन २००८ पासून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू असल्याचे आतापर्यंतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सांगितले आहे. तर साखर कारखाना तोट्यात असल्यास नुकसानीचे कारण स्पष्ट करावे. साखर उत्पादन,
सहनिर्मिती, इथेनल उत्पादन किती आणि खर्च किती झाला आहे. वार्षिक अहवालात अध्यक्षांच्या भाषणानुसार वित्तीय संस्थांकडून २८२ कोटीचे कर्ज आणि तीन वित्तीय संस्थांकडून १५० कोटीचे खेळते भांडवल दाखवण्यात आले आहे. वरील संस्थांनी वरील रकमेपैकी प्रत्येकासाठी आकारलेले व्याज दर स्वतंत्रपणे जाहीर करावे. सन २०२३-२४ चा वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च ४०.३३ लाख दाखवला आहे. प्रत्येक वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कॉल डिपॉझिट रकमेचा तपशील आणि व्याजदर स्वतंत्रपणे द्यावा, यासह विविध प्रश्नांची उत्तरे मागितली होती.मात्र ती दिली गेली नाहीत
अखेर सभेसाठी जात असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारा जवळ धक्काबुक्की करत आडवून सभेला नाकारण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. शिवाय धक्काबुक्की करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत मंडल पोलीस निरीक्षक तळवार यांना निवेदन देण्यात आले.
ठिय्या आंदोलनात सर्जेराव हेगडे, बंटी पाटील, बबन जामदार, नितीन कानडे, सुनील पाटील, अजित नलावडे, बाबासाहेब पाटील, सागर पाटील, सतीश किल्लेदार, विश्वनाथ किल्लेदार, सचिन कोळी, रामचंद्र मगदूमज्ञ, ईश्वर कुंभार, चिनू कुळवमोडे, एकनाथ सादळकर, नितीन कानडे, बबन जामदार, बाळासाहेब ऐवाळे, रमेश कोळी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.