निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी (ता. १७) होत आहे. सुमारे १५ महिन्याच्या प्रशासकीय राजवटीनंतर शहराच्या मुलभुत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची पहिली सभा होत आहे. या पहिल्या सभेत २४ तास पाणी योजना स्थायिक करून पूर्वीप्रमाणे पाणी सोडून पाणी बिल आकारण्याचा ठराव करावा, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकांन्वये केली आहे.
पत्रकातील माहिती अशी, गेल्या दोन तीन वर्षांपासून निपाणी शहर आणि उपनगराला पाणी प्रश्न सतावत आहे. या प्रश्नावर चर्चा करून नियोजनबध्द व शुध्द पाणी पुरवठा शहरातील सर्व प्रभागात करणे महत्त्वाचे आहे. जवाहर जलाशय पुर्ण क्षमतेने भरून राहण्यासाठी व पाणीसाठा वाढण्यासाठी तलावातील गाळ स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने काढणे आवश्यक आहे. गाळ किती आहे याची पक्की माहिती कोणालाही नाही. त्यामुळे पाणीसाठा जास्त होईपर्यंत २४ तास पाणी योजना स्थगित करावी. नागरिकांना एक दिवस किंवा दोन दिवसाआड पाणी योग्य त्या दाबाने पुरवठा करावा. सध्या पाणी मिटर बाबतीत नागरीकांची तक्रार आहेच. तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुर्ववत वार्षिक पाणी बील आकारणी करणेचा एकमताने ठराव करावा, अशी सर्वांचीच मागणी आहे.
पाणी साठ्यानंतर वाटपाचे धोरण ठरवावे लागेल.तरच पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात नागरिकांना भटकंती करावी लागणार नाही. तरी या लोकेच्छेचा आदर करून ठराव मंजूर करावा, असेही प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकात म्हंटले आहे.