रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार: हेस्कॉम अधिकारी, रयत संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यासह मुख्यमंत्री पर्यंत निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. पण आजतागायत ही भरपाई मिळालेली नाही. तात्काळ ही भरपाई न दिल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. बेळगाव येथील हेस्कॉम कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
दोन वर्षांपूर्वी बेनाडी, जैनवाडी, आडी, बोळेवाडी, मानकापूर, शिवापुरवाडी हुन्नरगीसह अनेक गावातील ऊसाला शॉर्टसर्किटने आग लागली होती. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठाकडे पाठवला होता. त्याशिवाय रयत संघटनेतर्फे निवेदन देण्यासह आंदोलन केले होते. पण आज जागा आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतीवाडीतून गेलेल्या वीज खांबांच्या वाहिन्या लोमकळत आहेत. त्याचा ऊस पिकासह शेतकऱ्यांना धोका होत आहे. त्यामुळे या वाहिन्या सुरळीत करण्याची मागणी केली होती. गावासह शेतीवाडीतील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्या उघड्यावर आहेत. त्यामुळे विजेचा धक्का बसून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत ही संघटनेतर्फे निवेदन देऊन चर्चा केली होती. अनेक गावातील हेस्कॉमचे वायरमन आपापल्या गावी वास्तव्यास आहेत. त्यांनी संबंधित गावातच राहून नागरिकास शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. पण वरील सर्व मागण्यांची पूर्तता न झाल्याने या पुढील काळात संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, आडी शाखाध्यक्ष बाबासो पाटील, निपाणी तालुका सेक्रेटरी सर्जेराव हेगडे, न संघटनेचे उपाध्यक्ष बबन जामदार, मानकापूर ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले, शेती अधिकारी विजय माळी, जयपाल व्हनशेट्टी, बबन माळी, संजय माळी, तात्या निंनगुरे, लक्ष्मण कोळी, तानाजी चौगुले, राहुल कुबाकरडी, जावेद मुल्ला, वासू पांढरोळी, मुबारक तांबोळी, राजेसाब जुटदार, सदाशिव पाटील, लक्ष्मण तराळ यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.