निपाणी : निपाणी शहर तसेच परिसरातील गावातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसापासून नागरिकांना सिलेंडरसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नंबर लावल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर सिलेंडर धारकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळत आहे. त्यातच वितरकाकडून ओटीपीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपला भारत देश डिजिटल इंडिया होत असला तरी देखील देशातील ग्रामीण भागात आजही बहुतांश लोक मोबाईलपासून वंचित आहेत तर बहुतांश लोकांजवळ मोबाईल असून देखील मोबाईलद्वारे गॅस सिलेंडर नंबर लावता येत नाही. मोबाईलद्वारे घरगुती गॅस सिलेंडरचा नंबर लावणे सुलभ वाटत असले तरी देखील निपाणी शहर आणि परिसरातील सिलेंडर धारकांची परिस्थिती म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी काहीशी झालेली पाहायला मिळत आहे. ओटीपीच्या नावाखाली गॅस कंपन्यांमार्फत नागरिकांचे हाल होत असून यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी निपाणी शहर आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.