निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी (ता.१४) संदल बेडीचा उरुस पार पडला. मंगळवारी (ता.१५) भर उरूस झाला. त्यानिमित्त नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
फकीर आणि मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह तुरबतीला नैवेद्य दाखवून भाविकांनी आपल्या दंडातील चांदीची बेडी दंडवत घालण्यासह देवाला गलेफ अर्पण केला. गंधरात्रीनिमित्त चव्हाण घराण्यातर्फे गंध व गलेफ मानकऱ्यांसह सवाद्य नेऊन तुरबतीस अर्पण करण्यात आला. चव्हाण वारसां तर्फे मलिदा, ताक, कण्या व गोडा नैवेद्य अर्पण त्याला. गंधरात्री जिजामाता चौकात आतषबाजी करण्यात आली. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, रणजित देसाई सरकार, संग्रामसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, राजूबाबा निपाणकर, संजय माने, विवेक मोकाशी, जयराम मिरजकर, प्रभाकर पठाडे, शरद माळगे, बाळू पोतदार, बंडा गंथडे, संतोष गंथडे, सनी साळुंखे, आतिष सुतार, सदाशिव डवरी, सचिन पावले, उरुस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मानकरी उपस्थित होते. बुधवारी (ता.१६) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खारीक उदीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता.१७) मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना, शुक्रवारी (ता.१९) चव्हाण वारसासह मानकर यांच्या उपस्थितीत पाकाळणीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच संत बाबा महाराज चव्हाण समाधी व दर्गाहला गोडा नैवेद्य दाखविला जाणार आहे.
उरूस उत्सवासाठी शिवाजी चौक, कामगार चौक, दर्गाह गल्ली व दर्गाह परिसरात विविध खेळण्यांची दुकाने, मेवा मिठाईची दुकाने थाटण्यात आली आहेत. पाळण्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सुरळीत दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. राजू मुजावर, हमीद मुजावर, सुभान मुजावर, ख्वाजा मुजावर, मोदीन मुजावर, निहाल मुजावर, सद्दाम मुजावर, जाफर मुजावर, शब्बीर मुजावर, सलमान मुजावर, यासीन हवालदार, परशराम विटेकरी, रफीक बुदिहाळे यांच्यासह मानकरी मान्यवरांची उपस्थिती होती. उरुस काळात अनुचित घटना घडू नयेत, यासाठी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, रमेश पोवार त्यांच्यासह पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विविध बॅरिकेड्स लावल्या आहेत.