माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
या बाबत माहिती देतांना माजी आमदार पाटील म्हणाले, वायुसेनेतील निवृत्त आयएल-३८ विमान नाहकपणे गोवा येथून निपाणीत आणण्याचा घाट घालण्यात आला. त्यासाठी २.५९ कोटींच्या क्रिया योजनेस मंजुरी देण्यात आली. निपाणीत अबालवृध्दांच्या फेरफटक्यासाठी उपयुक्त असलेल्या पंतनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची जागा नागरीकांची कोणतीही संमती न घेता देण्यात आली. सदर विमानाचे विविध अंग सुटे करण्यासाठी ९४.५५ लाखांची तरतूद केली. गोवा येथून निपाणी विमानाच्या सुट्या भागांच्या वाहतुकीचा खर्च १९.६४ लाख इतका करण्यात आला आहे. त्यानंतर नियोजीत ठिकाणी सदर विमान पुन्हा जोडण्याकरीता ९४.२० लाख इतका खर्च करण्यात आला आहे. तर २० टन क्षमतेचे एअरकंडीशनिंग आणि विमानाच्या नूतनीकरणाचा खर्च २२ लाख रूपये करण्यात आला. याची क्रिया योजना मंजूर होवून त्याच्या निविदा प्रसिध्द होवून काम पूर्णही करण्यात आले. मात्र यामध्ये खर्च झालेल्या २.५९ कोटी रूपयांपैकी केवळ १ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत. तर उर्वरित रक्कमेसाठी तगादा लावण्यात आला. सदर रक्कम नगरपालीकेने भरण्याचा घाट आमदार शशीकला जोल्ले यांनी घातला आहे. जयवंत भाटले हे नगराध्यक्ष असताना ब्लूस्कायएवीनेशन कन्सलटसीचे मालक राजा व्यंकटेशकुमार यांना सदर निविदा देण्यात आले.
विमान हे निपाणीकरांसाठी असून अडचण बनले आहे. विमानाची देखभाल नसल्याने ते धूळखात पडले असून याकडे पर्यटकांचीही वाणवा आहे. विमानाने जागा अडविल्याने येथे फिरावयास, विरंगुळ्या साठी येणाऱ्या शेकडो नागरीकांचीही कुचंबना झाली आहे. नगरपालिका आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत असतांना नगरपालिकेवर हा नाहक बोजा चढविण्याचे काम म्हणजे नालेसाठी घोडा घेण्याचा प्रकार आहे. तसे आम्ही होवू देणार नाही. पालीकेने विमानासाठी एक रूपयाही देवू नये. त्यासाठी आपल्या व सहकार्यां तर्फे व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. जोल्लेंनी नाहक बसविलेल्या विमानाचा खर्च निपाणीकरांच्या माथी मारू देणार नाही असेही माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सांगितले.