निपाणी (वार्ता) : दरवर्षी अनेक कारखाने दर जाहीर न करता ऊस तोडणी करतात. यंदाही अनेक कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. याउलट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश धुडकावून कारखाने सुरू केले आहेत. याशिवाय पूर परिस्थितीमुळे सोयाबीनसह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाई मिळालेली नाही, यासह विविध समस्या घेऊन बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन स्थळावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन न्याय हक्कासाठी जात-पात धर्म, भाषा, गट तट विसरून एकत्रित यावे, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. बेनाडी येथे आयोजित शेतकऱ्यांच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.
ऊस तोडणी हंगाम काळात मुजराकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. शिवाय वाहतूकदार एन्ट्री घेऊनच वाहने शेतातून बाहेर काढतात. अशा प्रकारची पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी विधानसभा भावनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी एकत्र आला तरच आपल्याला भविष्यात न्याय मिळणार असल्याचेही राजू पोवार यांनी सांगितले. यावेळी अशोक क्षीरसागर, आप्पासाहेब मिरजे, पुंडलिक शिंदे, कुमार खेम्मान्ना, बाळू मंगावते, बाबू जनवाडे, तात्यासाहेब केस्ती, मधुकर पाटील, नितिन कानडे, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, सागर पाटील, शिवगोंडा पाटील, संजय जोमा, रमेश कोळी, सचिन कांबळे, रामचंद्र मगदूम, ईश्वर कुंभार त्यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थिती होते.