राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक
निपाणी (वार्ता) : ओला दुष्काळ, उन्हाळ्यातील दुष्काळ, अतिवृष्टी महापूर काळात शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह, ऊस, तंबाखू, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याशिवाय दरवर्षी हंगाम काळात विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे शेकडो एकरातील ऊस जळत आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रयत संघटना शासनाला निवेदन देऊन आंदोलन करत आहे. तरीही अशा शेतकऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या पुढील काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रयत संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
बेंगळुर येथी गांधी भवनमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पोवार म्हणाले, सोयाबीन, कापूस, ऊसासह इतर पिकांचे महापुरामध्ये नुकसान होत आहे. पण नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस योजना राबविणे आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बेळगांव मध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पोवार यांनी केले.
बैठकीस रयत संघटनेचे आमदार दर्शन पुट्टय्या, रयत संघटनेचे अध्यक्ष चुन्नापा पुजारी, सुरेश परगन्नावर, प्रकाश नाईक, महेश सुभेदार, आशा एम., सुगंधा दोडमणी, मुरली दोडमणी, संगमेश सागर, दिनेश शिमोग्गा, श्रीनिवास रेड्डी, विद्या सागर यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta