निपाणी (वार्ता) : येथील शुभकार्य वधू-वर सूचक केंद्रातर्फे येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात राज्यव्यापी सकल मराठा समाज वधू- वर परिचय मेळावा पार पडला. त्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला.
प्रारंभी दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, सध्याच्या काळात संसारी आणि व्यावसायिक जबाबदारीमध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे नातेसंबंधातील संवाद कमी झाल्याने वधू वर मेळाव्यांची गरज निर्माण झाली आहे. तर मुलींची संख्या घटत असून वधू मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय पालकांसह नियोजित वधूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद साधून विवाह जमवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात ३०० हून अधिक मुला-मुलींनी नोंदणी केली. व्यासपीठावरून वधू-वरांचा परिचय करून देण्यात आला. मिळाल्यास टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे दिलीप पठाडे, रमेश भोईटे, अनिल खाडे, विनोद साळुंखे, विनोद बल्लारी, संदीप कामत, दत्ता मांजरे, डॉ. संदीप चिखले, सागर देशपांडे, संतोष गुरुजी, गजानन परीट, गणेश शिंदे, विश्वनाथ जाधव,विकास शिंदे, प्रशांत कोळी यांच्यासह वधू-वर पालक उपस्थित होते. एस.डी. साखळकर, राजश्री चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. विश्वनाथ जाधव यांनी आभार मानले.