निपाणीत सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीत ठराव
निपाणी : महाराष्ट्र राज्याच्या नवीन सभागृहातील आमदारांनी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे या करीता महाराष्ट्र एकीकरण समीती निपाणी भाग निपाणी, शिवसेना निपाणी व या परिसरातील बहुसंख्य मराठी भाषिक यांच्या वतीने सदरचा ठराव देण्याचे निपाणीतील सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीमध्ये गुरुवार दि. २८/११/२०२४ रोजी ठरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नव्या सरकारचा कार्यभार नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सुरु होईल. आता या नव्या सरकारने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यावे आणि पहिल्याच अधिवेशनात ठराव संमत करून घ्यावा. त्याला अन्य पक्षानीही पाठींबा द्यावा, यात सत्तारुढ आणि विरोधक अशी भूमिका न घेता तो ठराव सर्व संमत्तीने व्हावा आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी कृति समिती, कृति कार्यक्रम, घटनातज्ञांची मदत सर्व स्तरावर प्रयत्न करुन सीमाप्रश्नाचे प्राधान्याने आपले उद्दिष्ट ठरवावे, मराठी भाषेला जसा केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा देऊन न्याय दिला. तसा १९५६ पासून कर्नाटकामध्ये अन्यायाने डांबलेल्या लाखो सीमावासीयांना न्याय देवून महाराष्ट्रात समाविष्ट करून घ्यावे असा ठराव एकमताने यावेळी करण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी विभाग अध्यक्ष जयराम मिरजकर, अच्युत माने, लक्ष्मीकांत पाटील, कबीर वराळे, तुकाराम काेळी, अशोक खांडेकर, नंदकुमार कांबळे, उदय शिंदे, राजकुमार मेस्त्री, बाबासाहेब कांबळे, अवधूत खटावकर, बाबासाहेब मगदूम, एम आर ढेकळे, रमेश कुंभार, चेतन चौगुले, आ. अ. नारे, श्रीकांत कासुटे आदी उपस्थित होते.