निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील आंबा मार्केट येथील रहिवासी प्रा. अजित चंद्रकांत सगरे (वय ६७) यांचे शनिवारी (ता. ३०) नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरावर शोककळा पसरले आहे. बेडकीहाळ येथील कुसुमावती मिरजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.
प्रा. सगरे यांचे कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीत मोठे योगदान होते. निपाणी व बेळगाव परिसरातील लहान मोठ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता. निपाणी शहरात झालेले तंबाखू शेतकरी आंदोलन, देवदासी चळवळ, परिवर्तन चळवळ, सीमा प्रश्नावरच्या चळवळीत सहभाग होता. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. अंबा मार्केट येथून त्यांची अंत्ययात्रा काढून बसवान नगर येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी आमदार प्रा. सभाष जोशी, प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर, नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रशांत गुंडे, विठ्ठल वाघमोडे, प्रा. एन. आय. खोत, प्रा. नानासाहेब जामदार, रवींद्र आवटे, अशोक खांडेकर, विश्वनाथ जाधव, जयराम मिरजकर, बाबासाहेब मगदूम, विजय मेत्राणी, कृषी पंडित सुरेश देसाई, डी.एन. दाभाडे, प्राध्यापक गोपाळ महामुनी, प्रा. आनंद संकपाळ, साहित्यिक कबीर वराळे, प्रा. नवजीन कांबळे, विलास शिंदे, रवींद्र इंगवले, पैलवान आप्पासाहेब खोत, दीपक इंगवले, निवृत्त पोलीस अधिकारी एन. जे. पाटील, बंडा पाटील, अजित पाटील यांच्यासह मान्यवरांनी प्रा. सगरे यांना आदरांजली वाहिली. सोमवारी (ता.२) सकाळी नऊ वाजता रक्षाविसर्जन आहे. प्रा. सगरे यांच्या मागे दोन बहिणी असा परिवार आहे.
—————————————————————–
काव्यसंग्रहाचे स्वप्न अधुरे
प्रा. अजित सगरे यांनी ‘आकांत’हा काव्यसंग्रह लिहिला होता. त्याच्या प्रकाशनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली होती. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याने काव्यसंग्रहाचे स्वप्न अधुरे राहिले.