फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन
निपाणी (वार्ता) : साधु, संत, महापुरुष आणि महात्म्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या विचारधारा दिल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने समाज अधोगतीकडे जात आहे. भेसळयुक्त पदार्थ निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे महापुरुषांनी घालून दिलेल्या शिकवणी आचरणात आणून त्यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा वाहन पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. येथील डॉ. आंबेडकर विचारमंच तर्फे रविवारी (ता.१) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनाच्या पटांगणात आयोजित २८ व्या फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलनात ‘शिवराय ते भिमराय यांच्या स्वप्नातील भारत देश, राजकारणापलीकडील जनसेवा: एक निरपेक्ष समाजकारण’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
भास्करराव पेरे -पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात माणसाचे आयुष्य कमी होत आहे. त्यासाठी आहे त्यामध्ये समाधानी रहावे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, वृक्षारोपण, शुद्ध पाणीपुरवठा महत्त्वाचे असून भेसळीपासून दूर राहावे. मुलांना शिकवा, त्यांच्यावर चांगले संस्कार करा, वडीलधाऱ्यांचा मान राखा, दुसऱ्यांचा द्वेष केल्यास जीवन असमाधानी बनते. कोरोना रोग आलाच नव्हता केवळ ऑक्सिजन कमी पडल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. अंत्यसंस्कारानंतरची राख पाण्यात न टाकता खड्ड्यात टाकून त्यात झाडे लावल्यास निसर्गाचा समतोल bराखता येईल. समाजातील चुकीच्या संकल्पना असून विज्ञान समजून न सांगितल्याने अंधश्रद्धा वाढत आहे. वृद्धांची सेवा करून समाजाचा अभ्यास करत प्रगती साधता येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विद्रोही शाहीर रणजीत कांबळे म्हणाले, संमेलनामधून विचारांचे मंथन होत असल्याने गावोगावी संमेलन भरविणे गरजेचे आहे. प्रत्येक जण सुखाच्या मागे धावत असल्याने महापुरुषांचे विचार मागे पडत असल्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाने मक्तेदारीचा शोध घेऊन आपले स्थान टिकवले पाहिजे. महापुरुषांनी लोकशाहीचे मूल्ये रुजवली असून ती टिकवण्याचे काम समाज बांधवांनी केले पाहिजे. त्यांची दूरदृष्टी जाणून घेऊन त्यांना वाचता आले पाहिजे. कोणतेही काम किंवा चळवळीचे यश हे महिलांवरच अवलंबून आहे. आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येकाने लढले पाहिजे.
संविधानामुळे अनेक सुख सुविधा सर्वांना मिळाले आहेत. त्यामुळे संविधान लिहिणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे प्रत्येकाने नित्य स्मरण करावे. वाचनामुळे मस्तक सुधारत असल्याने प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. संविधान सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी काम करणे गरजेचे बनले आहे. सामाजिक सामाजिक समतेच्या विचारांची बीजे विचार संमेलनाच्या माध्यमातून रोवली आहेत. शिवाय जात,धर्म, पंथ भाषा भेद या पलीकडे जाऊन सुरू असलेले काम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रारंभी कपिल कांबळे यांनी बुद्ध वंदना दिली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अजित सगरे यांना आदरांजली वाहण्यात आली. संतोष कांबळे यांनी स्वागत केले. व्यासपीठावरील मानावरांच्या हस्ते क्रांती मशाल प्रज्वलित करण्यात आली. मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी प्रस्ताविकातून विचार संमेलनातील २७ वर्षातील आढावा घेतला.
संमेलनास बुडा अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, प्रा. डॉ. अच्युत माने, अशोककुमार असोदे, डॉ. श्रीकांत वराळे, राजेश कदम, सत्यजित पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजेंद्र वड्डर-पवार, तानाजी सावर्डेकर, राजू पाटील-अक्कोळ, विजय मेत्राणी, गणी पटेल, प्रवीण सुतळे, अशोक लाखे, दिलीप पठाडे, अजय माने, सुनील शेवाळे, प्रा. आनंद संकपाळ, जयराम मिरजकर, गजेंद्र पोळ, रवींद्र श्रीखंडे यांच्यासह निपाणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन तर राहुल भोसले यांनी आभार मानले.