
सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा
निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी व्यक्त केले. सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या सेवा निवृत्ती निमित्त येथील मराठा मंडळात आयोजित सन्मान सोहळ्यात ‘राष्ट्राच्या जडणघडणीत तरुणांचे योगदान’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
प्रा. पाटील म्हणाले, आपल्या देशात परदेशातील कंपन्या आपल्यावर राज करीत आहेत. त्यांना थोपविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. नट ऐवजी देशासाठी लढणारा सैनिक युवकांचा आदर्श बनला पाहिजे. सैनिक सेवा अवघड असून डोळ्यात तेल घालून रक्षण करावे लागते. देशाच्या रक्षणासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे. शिवाय लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज असल्याचे पाटील आणि सांगितले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, रोपाला पाणी घालण्यात आले. त्यानंतर शिवपुतळ्याचे पूजन झाले.
तत्पूर्वी बेळगाव नाक्यावरून सुभेदार मेजर गजानन चव्हाण दाम्पत्यांचा सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गौरव समिती सदस्य दीपक इंगवले यांनी स्वागत केले. यावेळी विविध संघटना व नागरिकातर्फे मेजर चव्हाण यांचा सत्कार झाला. कर्नल शिवाजी बाबर, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, शिवकुमार हिरेकुडे यांनी मनोगत केले. मेजर चव्हाण यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या कार्यकाळातील अनेक आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमास माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, कर्नल जगदीश गाडेकर,व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, प्रा. डॉ. अच्युत माने, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, डॉ. विनय निर्मळे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, गजानन शिंदे, रवींद्र शिंदे, नाना मिरजकर, पंडित पाटील, सुनील बल्लोळ, रमेश भोईटे, दिलीप पठाडे, धनाजी भाटले, कुमार पाटील, नगरसेविका अनिता पठाडे, शौकत मनेर, संजय पावले यांच्यासह निपाणी व परिसरातील आजी-माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते. प्रा. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर सोनाळकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta