१४ जणांचे पथक ; १२ तास चौकशी
निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील पश्चिमेला असलेल्या आदर्शनगर आणि अक्कोळ येथे बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.८) पहाटे धाड टाकली. अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक २९ मधील आदर्शनगर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊससह त्यांच्या अकोळ येथील सासरवाडी मधील घरामधील चौकशी केली. पहाटे सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. सायंकाळी उशिरा येथील धर्मवीर संभाजीराजे चौकातील चव्हाण यांच्या मॅनेजमेंट इन्फ्रा या कार्यालयातही चौकशी चालू ठेवली होती. या पथकामध्ये १४ अधिकारी आणि ४ वाहनांचा समावेश होता.
याबाबत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, खानापूर येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या संबंधित असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील अनेक अधिकारी व नागरिकांच्या घरावर छापा टाकला. त्यानुसार चव्हाण हे गायकवाड यांच्याशी संबंधित होते. त्यामुळे त्यांच्या घरासह सासरवाडी व कार्यालयात मालमत्ता, सोने चांदी दागिने व इतर वस्तूंची चौकशी केली. याशिवाय चव्हाण यांनी बांधलेले फार्म हाऊस, त्यासाठी घेतलेली जागा याबाबत कागदपत्रांची चौकशी केली. तसेच जागा आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी काढलेल्या कर्जाची बँकेत जाऊन कागदपत्रांची चौकशी केली. तहसीलदार गायकवाड यांच्या पत्नीची मोटार विक्रीसाठी मध्यस्थ म्हणून चव्हाण यांनी काम केले होते. त्यामुळे टीटी फॉर्मवर सही होण्यासाठी ठेवलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. या छाप्यामुळे निपाणीतील बड्या हस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये लोकायत डीएसपी बी. एस. पाटील, लोकायुक्त सीपीआय अन्नपूर्णा, लोकायुक्त पीएसआय अजिज कलादगी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.