खासदार प्रियंका जारकीहोळी ; बोरगाव भेटी दरम्यान दिली ग्वाही
निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे नूतन श्री 1008 भगवान सुपार्श्वनाथ जीनभिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सव व विश्वशांती महायज्ञ होणार आहे. या महामहोत्सवात गावात कोणतीच अडचण होणार नाही, याची दक्षता घेऊन सहकाररत्न उत्तम पाटील व चांद शिरदवाड मधील नागरिकांच्या मागणी नुसार या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी दिली. बोरगाव येथे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या निवासस्थानी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी जारकीहोळी बोलत होत्या.
चांद शिरदवाड येथील दिगंबर जैन समाजातर्फे सहकारत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रियंका जारकीहोळी यांना पंचकल्याण महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले.
उत्तम पाटील म्हणाले, सोमवार (ता. 14 एप्रिल) ते रविवार (ता.20) अखेर चांद शिरदवाड येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सव व विश्वशांती महायज्ञ होत आहे. त्यासाठी गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, श्रावक श्राविकांना शुद्ध पाणी, सुरळीत वीज पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा व्हावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. जैन समाजाच्या समुदाय भवनासाठीही यांनी मागणी केली असून यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरीचे आश्वासन दिले आहेत. खासदार फंडातून येथील मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे व या ठिकाणी होत असलेल्या पंचकल्याणात महा महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती केली.
याप्रसंगी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील, जीवंधर फिरगणनावर, चिंतामणी पाटील, रामगोंडा पाटील, सुभाष पाटील, गोटू पाटील, शीतल पाटील, पोपट शमणेवाडे, किरण पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta