डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड (ता. निपाणी) येथे १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन १००८ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार (ता.१४) ते रविवार (ता.२०) अखेर होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील यांनी दिली. जैन मंदिर कमिटी, सकल दिगंबर जैन समाजातर्फे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
डॉ.पाटील म्हणाले, संयममूर्ती आचार्य वर्धमान सागर महाराजांचे शिष्य १०८ धर्मसागर महाराज, १०८ विद्यासागर महाराज, १०८ सिद्धार्थसागर महाराज व मुनी महाराजांच्या सानिध्यात नांदणी येथील जिनसेना भट्टारक भट्टाचार्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीयांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याणा प्रतिष्ठा महामहोत्सव धार्मिक विधींचा मंगल प्रवचन व प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी (ता.१४) पहाटे गुरु निमंत्रण, आचार्य निमंत्रण, इंद्रप्रतिष्ठा, मंगल ध्वजारोहन, मंडप उद्घाटन, कलश स्थापना दीपस्थापना पंचामृत अभिषेक व प्रवचन होणार आहे. मंगळवारी (ता.१५) मंगल कुंभनयन, यागमंडल आराधना, नवग्रह होम, मंदिरात वास्तुविधान, मुनी संघाचे प्रवचन, सायंकाळी ५ वाजता तीर्थंकर माता-पित्यांचे मंडपात आगमन, हत्तीवरून भद्रकुंभ व गर्भकल्याण उत्तरार्ध मातेची सेवा होणार आहे.
बुधवारी (ता.१६) ५६ कुमारीका समवेत मंगल कुंभनयन ,पंचामृत अभिषेक, जन्म कल्याण विधान,गुरुवारी (ता.१७) पहाटे धार्मिक विधीनंतर दुपारी ५६ देशांच्या राजाकडून नजराना अर्पण, राज्याभिषेक सोहळा होणार आहे. शुक्रवारी (ता.१८) पहाटेच्या कार्यक्रमा नंतर राज्यसभा, लोकांतिक देव आगमन व तपकल्याणक विधी होणार आहे. शनिवारी (ता.१९) केवळज्ञान कल्याणक संस्कार विधी, सूरी मंत्र, प्राणप्रतिष्ठापना, संस्कार समवशरण रचना, कुबेराद्वारे रत्नवृष्टी व विहार रथोत्सव मिरवणूक होणार आहे. रविवारी (ता.२०) पहाटे नित्य विधी, यजमानांचे आगमन व दुपारी कुबेरद्वारे रत्न वृष्टी, रात्री आरतीनंतर विहार रथोत्सव मिरवणूक होणार आहे.
महोत्सवास कोल्हापूर, बेळगाव, सांगली जिल्ह्यातील नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. दररोज सुमारे ५ हजार पेक्षा अधिक श्रावक, श्राविकांच्या भोजनाची व्यवस्था, मुनी महाराजांच्या आहार व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीस कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, यजमान अशोक नोरजे यांच्यासह बस्ती कमिटी पंचकल्याण कमिटी सदस्य, समस्त दिगंबर जैन समाज, ग्रामपंचायत सदस्य व श्रावक श्राविका उपस्थित होते.