निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता.१८) अल्पशा आजाराने निधन झाले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांची मागील काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगाव मधील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापासून तब्येतीमध्ये काही सुधारणा जाणवत नव्हती. रात्री दोन वाजता त्यांची तब्येत अचानक खालवल्याने डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाला यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या काळामध्ये त्यांना भेटण्यासाठी राजकीय, सामाजिक, सहकार, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरासह नागरिकांची गर्दी झाली होती.
माजी आमदार पाटील यांची राजकीय कारकीर्द खूप वादळी होते. राजकारणातील सर्व प्रकारची माहिती असणारा नेता म्हणून त्यांची वेगळी छाप होती. कणगला मतदारसंघातून पहिल्यांदा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. निपाणी विधानसभेचे त्यांनी तीन वेळा सलग आमदार होऊन हॅट्रिक साधली होती. काळम्मावाडी पाणी वाटप करार करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होतात्यांचे वक्तृत्व, नेतृत्व अतिशय वेगळ्या प्रकारचे होते. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांची उठबस अतिशय वेगळ्या प्रकारे होती. कर्नाटक सह महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. जनमानसात राहणारा, जमिनीवर पाय असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. निपाणी मतदारसंघातील प्रत्येक गावातील गोरगरीब कष्टकरी व दिनदलीतांना नावाने ओळखणारा एकमेव नेता म्हणून मतदारसंघात त्यांचे नाव आहे. त्यांच्या निधनाने निपाणी मतदारसंघ पोरका झाला आहे. त्यांच्या मागे चिरंजीव सुजय पाटील, स्नुषा, मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता निपाणी म्युनिसिपल हायस्कूल येथुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta