निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मातृभाषेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उच्च प्राथमिक मराठी मुला- मुलींची शाळा जत्राट व नागनूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती मीडिया व खजिनदार श्री. नेताजी पाटील आपले मनोगत व्यक्त करतेवेळी म्हटले की, निपाणी तालुक्यामधील सर्व सामान्यांच्या शिक्षणाचा ज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या प्राथमिक मराठी शाळा वाचवणे ही तुम्हा आम्हा सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी खांद्यावर घेऊन सर्व सामान्यांच्या शिक्षणाचा उद्धार करणाऱ्या वटवृक्ष रोपट्याचा विस्तार करण्याचा आणि त्यांच्यातील ज्ञानाचा अंधार दूर करून त्यांना त्यांना स्वावलंबी स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर करण्यासाठी सर्व सामान्यांच्या शिक्षणाचे मंदिर वाचवण्याचे संरक्षण कवच कुंडल निर्माण करून एक महत्वपूर्ण भूमिका निभावून गोर गरीब बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाचे दालन उभे करण्याचे पुण्याचे काम करूया. निपाणी तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश मराठी शाळांमध्येच घ्यावा. शिक्षण घेणे आणि शिक्षण शिकणे हे सर्व सामान्य कष्टकरी शेतकरी यांच्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे आणि हा जर टिकवला नाही तर सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि ते वंचित राहू नये म्हणून जागृत पालकांनी आपल्या गावातील मराठी शाळा वाचवण्यासाठी पुढे या, असे आवाहन समिती पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुक्याचे मार्गदर्शक के डी पाटील, मार्गदर्शक प्रमोद अण्णा कदम,आर एन कुलकर्णी, तानाजी लवटे, विनोद पाटील, आदित्य पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta