निपाणी (वार्ता) : नगरपालिका मालकीच्या दत्त खुले नाट्यगृहासमोरील तलावातील दूषित पाण्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली असली तरी नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत शासननियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता.९) नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपूर्वी पाण्यासाठी बांधलेला हा तलाव आता दुर्लक्षित अवस्थेत आहे. पाण्याचा गाळ काढण्याचे काम पूर्वी झाले असले तरी सध्या त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. परिणामी तलावातील पाणी दूषित होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
काही वर्षांपूर्वी मानवाधिकार संघटनेच्या मागणीवरून संबंधित विभागाने पाणी तपासणी केली असता पाणी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही पालिकेने ठोस पावले उचलली नाहीत. समाजमाध्यमांतून दररोज तक्रारी होत असल्या तरी प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला.
भविष्यात रोगराई पसरू नये म्हणून तलावातील दूषित पाणी उपसून तलाव कायमचा बंद करण्याची आणि महिनाभरात संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्त गणपती पाटील यांनी याबाबत सभागृहात चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, रवींद्र श्रीखंडे व विनोद बल्लारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta