नगरपालिकेच्या नोटीसीमुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतर्फे शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त आदेशानुसार गाळे रिकामी करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर या गाळ्यांचा फेरलिलाव केला जाणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गाळेधारकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत “आमच्या उदरनिर्वाहाशी निगडीत गाळे फेरलिलावातून देऊ नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला आहे.
शहरातील एकूण ४३० गाळ्यांपैकी तब्बल २२६ गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अचानक आलेल्या या नोटीसांमुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार की काय, अशी भीती व्यक्त होतआहे.
निपाणी नगरपालिकेने गेल्या काही दशकांत टप्प्याटप्प्याने गाळ्यांची उभारणी केली होती. चाटे मार्केटमध्ये सर्वप्रथम ८ बाय १० आकाराचे गाळे बांधण्यात आले होते. त्यावेळी भाडे केवळ ५० रुपयांच्या आसपास होते. त्यानंतर १९७५ साली भाजी मार्केटचे गाळे बांधण्यात आले, ज्यासाठी भाडे २५० ते ३०० रुपयांच्या दरम्यान होते. पुढील काळात टप्प्याटप्प्याने भाडेवाढ केली गेली. मात्र गाळे लिलाव न करता थेट धारकांना देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर फेरलिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राममंदिर (बेळगाव नाका) येथे गाळेधारकांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत फेरलिलाव न करता चर्चेतून व तडजोडीतून गाळे देण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. बैठकीस माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ, बाबासाहेब खांबे, माजी नगरसेवक बापू पोळ, संदिप वाडकर, अजित पाटील, सुरेश घाटगे, लक्ष्मण ठगरे, प्रशांत मोकाशी, रमेश चव्हाण, मानसिंग देसाई, शमेश बुडके, बशिर अत्तार, बाळ मोरबाळे, नारायण पावले, किशोर गायकवाड, खलील मलीक, विलास भंडारे, मुजिबखान पठाण, समीर पटेल, सौरभ जोरापूरे, हणमंत घाटगे आदींसह सुमारे २५० गाळेधारक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta