वाहतूक वळविली सेवा रस्त्यावरून; खरी कॉर्नर जवळ भुयारी मार्गाची मागणी
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे जोरदारपणे सुरू झाले आहे. सध्या शहराबाहेरील खरी कॉर्नर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरे, दुकाने आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडले जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कोंडी होत असून भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी वाहनधारकासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
प्रारंभीच्या काळात घरे दुकाने आठवड्याचे काम पोलिस बंदोबस्तात हे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून जेसीबी व पोकलँडच्या साहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या मागणीनुसार लवकरच येथे मोठ्या भुयारी मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या महामार्गावरून होणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून सुरू आहे. त्यासाठी या भागातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गाच्या निर्मितीसाठी रस्त्याच्या वीजखांब हटविले जाणार आहेत.खरी कॉर्नरच्या भुयारी मार्गातून शिवाजीनगर, बिरदेवनगर, पंतनगर, लेटेक्स कॉलनी, बडमंजी प्लॉट, यरनाळ, शिरगुप्पी, पांगिरे (बी) बुदलमुख, अर्जुनी, शेंडूर, गोंदीकुप्पी तहसीलदार प्लॉट येथील सुमारे ३० हजाराहून अधिक नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सध्याचा भुयारी मार्ग हा वाहतुकीला अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे. नगरसेवकविलास गाडीवड्डर यांनी हॉटेल गोल्डन स्टारजवळ छोटा भुयारी मार्ग व शिरगुप्पी रोड येथे नगरसेविका आशा विजय टवळे व नागरिकांनी दुसरा भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी केली आहे. अद्याप याबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला नाही. नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधून देण्याची मागणी केली आहे. शिवाय आवश्यक त्या ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण करून देण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta