फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातून फुलशेती करणारे शेतकरीही सुटलेले नाहीत. चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेवंती, गुलाब, झेंडूच्या झाडांचा दसऱ्यापूर्वीच खराटा झाला आहे. दसरा, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा झेंडू अतिवृष्टीने आडवा झाला आहे. त्यामुळे निपाणी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अतिवृष्टीमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. शिवाय चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ५० ते ६० रुपये प्रमाणे त्याची खरेदी विक्री झाली.
परिसरातील शेतकऱ्यांनी जरबेरा, गुलाब, झेंडूची शेती केली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे झेंडूच्या झाडांचे मोठे नुकसान झाले असून, झाडांचा खराटा झाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडूची झाडे खराब झाली. यामुळे अपेक्षित माल मिळाला नसून, फुलांचा दर्जा घसरला आहे. यामुळे बाजारात योग्य भाव मिळत नाही. खरीप हंगामातील इतर उत्पादक पिकांप्रमाणेच झेंडू शेतकऱ्यांनाही सरकारी मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सणांच्या काळात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना झेंडूचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल बनला आहे.
अतिवृष्टीमध्ये फूल उत्पादक शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. फूल उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत नाही. यामुळे भरपाई मिळत नाही. मात्र शासनाने खरीप हंगामातील पिकांप्रमाणे फुल शेतीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी फुल उत्पादक शेतकरी सतीश पाटील यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta