

दुसऱ्या दिवशी झाली अधिकाऱ्याकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पुणे बेंगलोर रोडवरील नगरपालिका समोरील टायर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) आग लागली. या दुर्घटनेत उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या दुकानातील सुमारे १२ लाख रुपये किमतीचे टायर व इतर मशीन जळून खाक झाले. येथे अग्निशामक दल आणि हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. शनिवारी(ता.१) दुपारी तहसीलदार मुजफ्फर बळीगार, हेस्कॉमचे अभियंते सुरेश तहसीलदार, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, मंडल पोलीस निरीक्षक एस. बी. तळवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिवाय जाधव कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

शुक्रवारी रात्री आग लागली असताना तहसीलदार, हेस्कॉमसह इतर अधिकारी घटनास्थळी न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. शनिवारी सकाळी येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण, नगरसेवक संजय सांगावकर व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि हेस्कॉमला जळीत घटनेची माहिती दिली. त्यानंतर वरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मोठी दुर्घटना घडली असताना संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांना जाब विचारला. घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
उत्तम जाधव हे गेल्या १२ वर्षापासून टायर, दुचाकींच्या बॅटऱ्या विक्रीचा व्यवसाय करत आहेत. शिवाय पंक्चर दुकान, टायर बदलण्याचे मशीनद्वारे काम करत होते. अशा दोन्ही मशीन आणि शेकडो नवीन टायर, दुचाकीच्या बॅटऱ्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सध्या प्राथमिक परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतरच नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अभियंते सुरेश तहसीलदार यांनी सांगितले. यावेळी आजी-माजी नगरसेवक व मान्यवरांनी घटनास्थळी भेट दिली.

Belgaum Varta Belgaum Varta