

निपाणी (वार्ता) : वसुबारसने दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातर्फे गोमातेची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.या सणासाठी लागणाऱ्या आकर्षक नक्षीदार पणत्या, विविध प्रकारच्या रंगीत रांगोळ्या, आकाश कंदील, सुवासिक तेल, अगरबती, मेणबती, कापूर, धुपासह अन्य साहित्य खरेदीसाठी निपाणी बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरु झाली आहे.
वसुबारसच्या निमित्ताने दुपारी गाईंना स्नान घालून त्यांना सायंकाळीकुंकवाचे तिलक, हारफुले अर्पण करण्यात आली. त्यानंतर गूळ-शेंगदाण्याचा नैवेद्य देण्यात आला. काही ठिकाणी शेतकरी बांधवांनी गोठ्यात पारंपरिक पद्धतीने पूजा करून पशुधनाच्या आरोग्य आणि उत्पादन क्षमतेसाठी प्रार्थना केली. दिवाळीचा शुभारंभ या ‘गोमाता पूजनाने’ होतो, अशी श्रद्धा असल्याने ग्रामीण भागात या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
शनिवारी (ता.१८) धनत्रयोदशी, म्हणजे धन्वंतरी जयंती साजरी होईल. सोमवारी (ता.२०) नरक चतुर्दशी, मंगळवारी (२१) लक्ष्मी कुबेर पूजन, बुधवारी (ता.२२) दीपावली पाडवा, रोजमेळ पूजन आणि बलिप्रतिपदा साजरी होणार आहे. तर गुरुवारी (ता.२३) भाऊबीज सणांने दिवाळीची सांगता होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta