

सूर्यकांत पाटील- बुदिहाळकर; बी. शंकरानंद यांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : सध्या नेते मंडळी खुर्ची टिकवण्याचाच प्रयत्न करत आहेत. अशा आव्हानातून नागरिकांना पुढे जायचे आहे. ‘सत्तेसाठी मी आणि माझ्यासाठी सत्ता’ असे राजकारण सुरू आहे. मात्र बी. शंकरानंद यांनी आपल्या सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज असून सध्याच्या युगात समाजात फूट पाडून तडजोडीचे राजकारण सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष आणि चळवळीची गरज आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील- बुदिहाळकर यांनी व्यक्त केले. माजी दिवंगत केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचा जन्मशताब्दी महोत्सव रविवारी (ता.१९) येथील वाल्मिकी कोळी समाज भवनात पार पडला. त्यावेळी अध्यय स्थानावरून पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, सध्या खर्च केल्यावरच कार्यकर्ते टिकत असून ही दुर्दैवाचे बाब आहे. बी. शंकरानंद यांच्याकडे वैचारिक देवाण-घेवाण होती. अखेर पर्यंत काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ होते. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून राष्ट्र उभारण्याचे काम केले आहे. यावलट गेल्या दहा वर्षापासून देशाला लुटण्याचे काम नेते मंडळी करीत आहेत. काम आणि स्वभावावर शंकरानंद यांनी देशभर लोकमान्यता मिळवली. देशात पुन्हा गत वैभव येण्यासाठी तरुणांना दिशा देण्याची वेळ आल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. अच्युत माने यांनी, सर्वसामान्य माणसामुळेच क्रांती होत असल्याचे बी. शंकरानंद यांनी दाखवून दिले आहे. सध्या एकाच घरात दोन दोन मंत्री पदे असून घराणेशाही संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. दलित आणि सवर्ण यांच्यात ते दुवा म्हणून त्यांनी काम केल्याचे सांगितले. शेंडूर येथील संजय कांबळे यांनी, हालसिद्धनाथ साखर कारखाना उभारणीत बी. शंकरानंद यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. तरीही कारखाना परिसराला दिलेले शंकरानंदनगर शब्द काढणे दुर्दैवाचे असल्याचे सांगितले. यावेळी चंद्रकांत कोठीवाले,प्रा. सुरेश कांबळे, जयराम मिरजकर, हिंदुस्थान लेटेक्सचे व्यवस्थापक पी. एन. गुप्ता, राजू पोवार, अस्लम शिकलगार, सुधाकर माने, यांच्यासह मान्यवरांनी बी शंकरानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रार्थना पूजन झाले. कार्यक्रमास विजय मेत्राणी, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले- सडोलकर, निरंजन कमते, गोपाळ नाईक, गणी पटेल प्रा. राजन चिकोडे, प्रसन्नकुमार गुजर, संजय महागावकर, गजेंद्र पोळ, प्रमोद कांबळे, अविनाश असोदे प्रा. डॉ. आर. के. दिवाकर, गणू गोसावी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. हिटलर माळगे यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta