

बेनाडीतील तंगडे कुटुंबीयांची दिवाळी ; कुटुंबात आहेत ३२ सदस्य
निपाणी (वार्ता) : शहरातील गगनचुंबी इमारतींमध्ये आणि कृत्रिम रोषणाईत हरवलेला सणाचा खरा आनंद अजूनही गावात सापडतो. नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण व इतर कामानिमित्त अनेक जण शहरात वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा गावाकडे येऊन सणाला हजेरी लावून जाणाऱ्या कुटुंबांची संख्या आहे. पण त्याला बेनाडी (ता. निपाणी) येथील तंगडे कुटुंबीय अपवाद ठरले आहे. हे ३२ जणांचे कुटुंब अजूनही विभक्त झालेले नसून तब्बल तीन पिढ्यांनी एकत्रित येऊन यंदा दिवाळी सण साजरा केला आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
सदाशिव तंगडे हे कुटुंब प्रमुख असून ते एका बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना सात भाऊ आणि दोन बहिणी आहेत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी दरवर्षी दसरा, दिवाळी आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेवेळी कुटुंबातील ३२ सदस्य दोन ते तीन दिवस एकत्र असतात. त्यांचे हे विधान अनेक ग्रामीण आणि शहरी लोकांच्यामनात घर करून गेले आहे.
या कुटुंबात फटाके आणि रोषणाई कधीच दिसली नाही. तर नात्यांची ऊब आणि परंपरेची सांगड पहावयास मिळते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरात आनंद दरवळतो. अंगणात रांगोळ्या, दारात तोरणे आणि मातीच्या दिव्यांची आरास केले जाते. सकाळच्या उटण्याच्या सुगंधापासून ते संध्याकाळच्या दिव्यांच्या प्रकाशा पर्यंत सर्वजण एकत्रित मिळून मिळून फराळ, जेवण करण्यासह अंगणात बसून जुन्या आठवर्षीना उजाळा देतात.
——————————————————————
अभियंते, डॉक्टरपासून शेतकरी
बेनाडी येथील तंगडे कुटुंबीय पूर्वीपासून शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. या कुटुंबात अभियंते, डॉक्टर्स, सहकार क्षेत्र, टपालक्षेत्र, वृत्तपत्र क्षेत्रात काम करणा-यासहसह शेतकरीही आहेत. याशिवाय कुटुंबामध्ये पशुपालन करूनही दूधाची विक्री केली जात नाही, हे या कुटुंबीयांचे वैशिष्ट्य आहे.
——————————————————————

‘शहरात वेग आणि यांत्रिकपण असले तरी गावात अजूनही माणुसकी आणि नात्यांची ऊब जिवंत आहे. म्हणूनच गावाकडची दिवाळी ही केवळ सण नाही, तर एक जिवंत परंपरा आहे. ती प्रत्येकाला आपल्या मुळांशी पुन्हा जोडते. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सर्व सण एकत्रित येऊन साजरे केले जात आहेत.गावातली दिवाळी म्हणजे निसर्ग, नाती आणि आनंद यांचा सुंदर संगम, जो शहरात कुठेही मिळत नाही.’
–सदाशिव तंगडे, कुटुंबप्रमुख, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta