
बिरदेव नगरातील घटना; बंद घराला केले लक्ष्य
निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बिरोबा माळ भागात सोमवारी (ता.१) भर दुपारी धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून चोरी केली आहे. चोरट्यांनी तिजोरी फोडली पण लॉकर न उघडल्याने लॉकरच घेऊनच पलायन केले आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी किती मुद्देमालाची चोरी झाली आहे, याची माहिती अद्याप संकलित केलेली नाही. निपाणीत चार दिवसात सलग तिसरी चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्य तत्परतेवर नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बिरोबानगर मुख्य रस्त्यावर सुनील वडगावे (मुळगाव यरनाळ, सध्या राहणार बिरोबा माळ) सोमवारी (ता.१) ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीसह दुचाकीवरून बँकेच्या कामासाठी अशोकनगर परिसरात गेले होते. दुपारी १२.१० वाजता घराला कुलूप असल्याने ते तोडून चोरटे घरातशिरल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी वडगावे यांना दिली.
चोरट्यांनी लॉकरची पेटी केवळ अर्धा तासात तोडून पलायन केले आहे. त्यामुळे संबंधित घराची रेकी केल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नोकरदार दांपत्यांनी घराला कुलूप जावे किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. चार दिवसात चोरीच्या चार घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासना समोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अष्टविनायक नगर, पंतनगर या दोन्ही ठिकाणी मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा सोमवारी भर दिवसा झालेल्या चोरीमुळे पोलीस प्रशासनासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अर्ध्या तासाच्या अंतराने घरात चोरी होते, हे वडगाव यांना पहिल्यांदा पटलेच नाही. त्यानंतर घरी परतल्यानंतर तिजोरी फोडून तिघा चोरट्यांनी लॉकर न तुटल्याने लॉकर पेटी घेऊन पलायन केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून ठसे तज्ञ, श्वान पथक पाचारण केले आहे. घटनेची माहिती मिळताच मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस एस. कार्जोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करीत आहेत.
——————————————————————-
शेजाऱ्यांना चाकूचा धाक
सुनील वडगावे हे कुटुंबीया समवेत बाहेर गेल्याचे पाहिल्यानंतर तिथेच पाळत ठेवलेल्या दोघा चोरट्यांनी गेटवरून उड्या मारून घरात प्रवेश मिळविला. यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या व्यापारी घोडके यांच्या निदर्शनास सदरची घटना आली. त्यांनी तात्काळ आरडा-ओरडा करून नागरिकांना जमविण्याचा प्रयत्न केला. आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्यानी आतूनच ठोक त्याला ठोका अशी आरोळी फोडली. भीतीने भयभीत झालेल्या दोघांना काही सुचायच्या आत चोरट्यांनी लॉकर पेटी घेऊन गेटवर उडी मारून रस्त्यावरील सर्वांना चाकूचा धाक दाखवत फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून पोबारा केला. सुदैवाने चोरटे तिथून जाताना येथील सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. प्रत्यक्ष मुद्देमाल किती केला याची अजून शहानिशा होणे बाकी आहे.
———————————————————–
बंद घरावर लक्ष्य
चार दिवसात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप पाहून नातेवाईकांकडे गेल्याचा सुगावा लागल्यानंतर या चोरीच्या घटना घडल्या आहेत. घरात किती सदस्य असल्याचा अंदाज घेत नेहमी चोरीचा बेत आखल्याचे स्पष्ट होत आहे. पण ही चोरी धाडसी म्हणावी की योजनाबद्धरितीने केलेला खेळ होता, हे समजणे कठीण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta