
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापूर काळात तालुक्यातील सोयाबीन, ऊस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल खात्यातर्फे त्याचा सर्वे झाला असला तरी अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय शेती पाणी पुरवठ्यासाठी दहा तास वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी उद्या गुरुवारी (ता.११) विधानसौधला कर्नाटक राज्य रयत संघटना धडक देणार आहे. त्याबाबत परिसरातील गावांमध्ये जनजागृती केली असून शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे.
उद्या गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजता तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी येथील अक्कोळ क्रॉस शेजारील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ एकत्रित जमायचे आहे. तेथून बसस्थानक, धर्मवीर संभाजीराजे चौक, साखरवाडी मार्गे तहसीलदार कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यकर्ते व शेतकरी बेळगाव येथील विधानसभेकडे रवाना होणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी बेळगावच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोवार यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta