
बोरगावमध्ये विद्यार्थ्यांनी भरावला आठवडी बाजार : विद्यासागर शिक्षण संस्थेचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : ‘मेथी, पोकळा, भाजी, कोथिंबीर, दोडके, वांगी, गवार, घ्या, आले, लसूण, कांदे घ्या, इकडे रताळे आलेत, फळे घ्या, केळी घ्या अशा नानाविध भाजीपाल्यांच्या आरोळ्यांनी बोरगाव येथील विद्यासागर संस्थेचे पटांगण गजबजुन गेले होते. संस्थेने भरविलेल्या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला आणून त्याची विक्री केली. त्याला पालकासह ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ताई, माई म्हणत विद्यार्थ्यांनी तासाभरातच भाजीपाल्याची विक्री केली. शिवाय भाजीपाला उत्पादन ते विक्रीपर्यंतचा प्रवास जाणून घेतला.
संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब आवले यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी थेट बाजारपेठेत फिरून विद्यार्थ्यांच्या भाजीपाल्याची खरेदी केली.
हावले म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात असून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला खरेदी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. भविष्यात त्याचा उद्योग व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना होईल, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना शेतकरी भाजीपाला कुठून आणतात, भाजीपाला पिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी या बाजारात घेतला.
संत सावता माळी यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी…’ या कवितेचा अर्थही विद्याथ्यांना समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी आठवडाभर लागणारा भाजीपाल, शैक्षणिक साहित्य, विविध खाद्यपदार्थ, फळांची विक्री केली.
सुनिता हावले, ऐश्वर्या हावले, सलोनी हावले, सोनाली हावले, वैशाली हावले, पूजा हावले, अनुज हावले, मुख्याध्यापक राजू खिचडे, एस. ए. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा बाजार भरवण्यात आला होता.
यावेळी बाबासाहेब पाटील, मलगोंडा म्हैशाळे, रावसाहेब तेरदाळे, विद्याधर, अम्मनावर, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे यांच्यासह संचालक, शिक्षक, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta