
कुर्लीत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन
निपाणी (वार्ता) : विज्ञान आणि संस्कृतीची सांगड असल्यास त्यातून नवनिर्मिती होत असते. मानवाने विचार केल्यानेच विज्ञानाचा शोध लागला आहे. प्रश्नोत्तरामुळेच विज्ञानाची प्रगती होत आहे. त्यामध्ये नवनिर्मितीची ताकत असून कल्पनाशक्तीला वाव मिळू शकते. त्यासाठी विज्ञाननिष्ठ प्रयोगातून गुणवत्ता सिद्ध करा, असे आवाहन संमेलन अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
कुर्ली येथील एचजेसी चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता. १४) सिद्धेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर पार पडले. त्यावेळी अध्ययक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, विज्ञान युगात अन्य गोष्टीवर विश्वास न ठेवता तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. वक्तशीरपणा महत्त्वाचा असून या युगात डोळसपणे वापरले पाहिजे. संशोधनासाठी कोणत्याही एका भाषेचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आयुष्यातील संगतीच्या परिणामामुळे अनेक चांगले शोध लावणे शक्य आहेत. विज्ञानामध्ये मोठी ताकद असून त्याबाबत आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. संशोधनात छोट्या सूचनाही महत्त्वाच्या असून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. गुणवत्तेची जोपासना करून विज्ञान साहित्य पुस्तकात आणण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापक टी. बी. चिखले यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन ॲड. संजय शिंत्रे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व मान्यवरांच्या असते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी ॲड. संजय शिंत्रे, के. डी. पाटील, एस. एस. चौगुले, विश्वनाथ पाटील अजित पाटील, संतोष निढोरे, नानासाहेब पाटील, डी. एस. चौगुले, दिगंबर माने, एस. एम. नदाफ, मच्छिंद्र निकाडे यांच्यासह स्कूल बेटरमेंट कमिटीचे सदस्य, आजी, माजी विद्यार्थी यांच्यासह निपाणी परिसरातील शिक्षक, विज्ञान प्रेमी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta