
सेक्रेटरी डॉ अमर चौगुले यांची माहिती; महाराष्ट्रातील ईबीसी सवलत लागू
निपाणी (वार्ता) : सर्व सोयीनियुक्त असलेल्या येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलला केंद्रीय (सीबीएसई) बोर्डाची मान्यता मिळाली आहे. केवळ चार वर्षात स्टेट स्कूलमधून सीबीएसई मान्यता मिळवणारी ग्रामीण भागातील ही पहिली शाळा आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांचे परिश्रम, संचालकांचे सहकार्य आणि पालकांच्या विश्वासामुळेच ही मान्यता मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी दिली.
शाळेमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
डॉ. चौगुले म्हणाले, अंकुरम शाळेमध्ये विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळ, पुस्तकी ज्ञान, कलाक्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. येथे शिक्षण घेतल्यास महाराष्ट्रात ईबीसी सवलत लागू मिळू शकते. मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी अशा चारही भाषांचे ज्ञान दिले जात आहे.
लवकरच विज्ञान शाखेतील पदवीपूर्व महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. सुरक्षित आणि आरोग्यदायी कॅम्पस निर्मितीला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम पाटील त्यांनी, नर्सरी ते बारावीपर्यंत एकाच छताखाली चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या सर्व संचालकांची मुले येथे शिक्षण घेत असल्याने शैक्षणिक दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. भविष्यात सर्व सोयींनीयुक्त निवासी शाळा आणि वसतीगृह निर्मितीचा मानस आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदयपासून जेईई, नीट, एनडीए अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. या शाळेत सैनिकी शाळेप्रमाणे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. उत्तम पाटील यांनी सांगितले.
बैठकीस संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या चेतना चौगुले, संचालक चंद्रकांत खोत, मीनाताई शिंदे, डॉ. जोतिबा चौगुले, सदाशिव गोविलकर, संदीप ननवरे, नम्रता चौगुले, डॉ. बलराम जाधव, अमित पाटील, सतीश रेपे, संतोष यादव, विनायक कुंभार, सचिन मोहिते यांच्यासह संचालक व शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta